कागदाच्याही फुलांना . . .

वृत्त :मध्यरजनी

 

कागदाच्याही फुलांना मिही म्हणतो गंध आहे
काय करता ? ह्या जगाशी रोजचा संबंध आहे !

 

मरतिके होऊन येती शब्द कानाच्या स्मशानी
प्राण आणुनि ऐकण्याची वाट आता बंद आहे .

 

थुंक बोटाची कशी ” ह्या ” फिरविती ते ” त्या ” वरीही ?
केवढे विद्वान ते अन् मी किती मतिमंद आहे !

 

जीभ असुनी बोलकी , मी सोंग आणावे मुक्याचे . .
मान डोलावीत बसणे हाच माझा छंद आहे !

 

सहज , श्वासातील दोरी तोडताही येत नाही . .
मी असा जगण्यात ह्यांना केवढा आनंद आहे !

 

मी खडुंनी चांदण्याच्या लिहितसे कविता नभावर
अनुभवांना अर्थ देणे हा सनातन छंद आहे !

 


( १९८५-८६ साली प्रकाशित सुमारे तीनशे दिवाळीअंकांचे वाचन करून त्यापैकी फक्त तेरा कविता निवडण्यात आल्या होत्या . त्यात निवड झालेली ही रचना , अक्षर दिवाळी १९८६ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आली . )


प्रतिक्रिया टाका