होतो अबोल तेव्हा . .

मात्रावृत्त : रसना
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )

 

होतो अबोल तेव्हा भलताच थोर झालो
‘ बोलायचे ‘ म्हणालो अन् बंडखोर झालो . .

 

हाती कुणा धरावे , त्यांना सुरेख जमले . .
त्यांची शिकार असली की, मी लगोर झालो . .

 

‘ व्हावे खटासि खट ‘ हे मी वाचले कुठेसे . .
जितके मुजोर ते, मी तितका मुजोर झालो . .

 

हा ताण एवढा का वाटे मला सुखाचा ?
त्यांच्याच वेसणीचा मी आज दोर झालो . .

 

ग्रीष्मातल्या कळ्यांच्या कानी हळूच सांगा . .
उद्यान जाळताना मी का कठोर झालो . .

 

 

.

प्रतिक्रिया टाका