हे दुटप्पी वागणे बरे नाही . .
वृत्त : दिंडी
गण : एकूण मात्रा १९ ( ९ + १० ) .मात्रांची रचना
हे दुटप्पी वागणे बरे नाही . .
फुंकरीने जाळ्णे बरे नाही !
तू दिले नाहीसही जरी काही ,
याचकाशी मागणे बरे नाही .
फूल कोमेजायचेच असताना,
जीव त्याला लावणे बरे नाही !
थांब टोचू लागली नखे आता
एवढे कुरवाळ्णे बरे नाही !
आजवर त्यांचे कुठे बरे होते ?
आजही त्यांना म्हणे, बरे नाही !
थाप पाठीवर अधेमधे द्यावी
रोजचे वाखाणणे बरे नाही !
एरव्ही सत्कार टाळता येतो
गुच्छ सुंदर टाळणे बरे नाही !
हे कुणाला हसल्या शिवाय कळले
आसवे सांभाळणे बरे नाही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा