हत्तीवर बसायचंय् ?

गुबगुबीत हत्तीवर
बसायचंय् काय ?
आधी सांगा , पाठीवर
ठेवणार कसा पाय ?

 

शिडीबिडी उचलायला
लागतो भारी जोर
जाडजूड लांबलचक
आणणार कुठून दोर ?

 

सोंडेलाच धरधरून
जरी काढलीत वाट . .
सुळ्यांमध्ये अडकाल
त्याची काय वाट ?

 

पांढरर्‍याफेक दातांवर
कसेबसे चढाल . .
फडक् फडक् कानांच्या
थपडीनंच पडाल !

 

टुणटुण उडया मारून,
शेपटीलाच धरा
लाथबिथ लागली तर
दवाखान्यात शिरा !

 

 

प्रतिक्रिया टाका