स्वप्न . . .
अभ्यास करता करता
मला झोप आली
शाळेचीच स्वप्नं
पडायला लागली . . .
आईचं बोट धरून
मंडईत गेले
भाजीविक्याला मी
सर म्हणू लागले . . .
शेवग्याचा शेंगेची
हिरवी फूटपट्टी
लाल लाल मिरच्यांचे
खडू तरी किती !
आल्याचे लहानमोठे
कैक खोडरबर
भेंड्याची बॉलपेनं
रुपयाला शंभर . . .
भोपळ्याचा मी घेतला
पृथ्वीचा गोल
उचलताना दप्तर
माझा गेला गोल . . .
कुशीवर वळले
नि स्वप्नच संपलं
स्वप्नातलं दप्तर
स्वप्नातच राहिलं !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा