सांडते भल्यांची अब्रूच माझियापाठी . .

अक्षरगणवृत्त : रंगराग
गण : गालगाल गागागा ! गालगाल गागागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८६

 

सांडते भल्यांची अब्रूच माझियापाठी . .
फाटकीच माझी झोळी बरी भिकेसाठी !

 

मोकळेपणी मी माझा हसायचो जेव्हा ,
केवढी जगाच्या भाळी उठायची आठी !

 

हात द्यायला नात्याचा कुणी नसेना का . .
सज्ज ही इथे वंशाची सफेदशी काठी !

 

पाहुनी अम्हा एकांती झुरायच्या बागा ,
लागता फुलाया दोघे निळ्या नदीकाठी .

 

सोडवू नको एकाकी असा जुना गुंता . .
आणखी नव्याने काही पडायच्या गाठी !

 

काव्य लेखने दिनांक २५.०४.२००३

प्रतिक्रिया टाका