सांज ढळल्यावर मला भेटून जा . .

वृत्त : मालीबाला

सांज ढळल्यावर मला भेटून जा . .
चंद्र रात्रीला जरा देऊन जा !

 

जागुनी शिणल्या शिशाच्या पापण्या !
त्यांतले ओझे तुझे घेऊन जा !

 

चिंब नेत्रांतील ह्या स्वप्नांवरी
श्रावणामधली उन्हे रेखून जा !

 

वाटते , मी तान व्हावे मोकळी . .
साखरेचा शब्द तू होऊन जा !

 

आरशाने फिरुनि दावाव्या अशा . .
तू खुणा अंगावरी कोरून जा !

 

दार सटवीला न मी खोलायची
त्या पहाटेला उद्या टाळून जा .

 

देहपण इतके रिते सोसू कशी ?
आपलेपण एकदा ओवून जा !

.

प्रतिक्रिया टाका