सर्व यंत्रेच माणसे येथे . .

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : लज्जिता
लक्षणे : गालगागा लगालगा गागा

सर्व यंत्रेच माणसे येथे . .
हृदय कोणासही नसे येथे !

का अशी लाजतेस सांगाया ?
लोक नाहीत फारसे येथे .

जे न शब्दांत मावण्याजोगे ,
प्रेम गाऊ तरी कसे येथे ?

एक पृथ्वी नि एक नभ मिळता ,
सदन बांधू हवे तसे येथे !

सांडणारेच चेहरे मळके . .
स्वच्छ कोठून आरसे येथे ?

वेचले ते न राखता आले . .
जमविले फक्त कवडसे येथे !

तू दिल्याने निरोप गहिवरुनी ,
रोज पाऊस पडतसे येथे !

.

—————————————
लेखनकाल १०.०४.१९८५
———————————————

प्रतिक्रिया टाका