श्री. अविनाश सांगोळे – गझल

एकेकाळी माझे येथे नाव सारखे गाजत होते –
एकेकाळी माझ्या मागे लोक सारखे लागत होते

 

त्या कोणाच्या बटा रेशमी गालावरती लहरत होत्या
ते कोणाचे होते डोळे हसून जे न्याहाळत होते !

 

थोड्यावेळापूर्वी येथे एक तमाशा पाहत होतो
सौख्य जिवाच्या आकांताने दु:खासाठी भांडत होते

 

थोडीशीही उसंत नसते कविता जेव्हा सोबत असते
तुला भेटलो नाही कारण शब्द सारखे भेटत होते !

 

पळून आलेल्यांचे कौतुक ! फितूर झालेल्यांचा गौरव
कुणा काळजी नाही त्यांची जे मेले वा झुंजत होते

 

समोर होती खोल दरे अन् वाट मागची गायब होती
कळे न कोठे गेले सारे जे जे माझ्या सोबत होते

 

एक साधा शब्दही तेव्हा गेला नाही वाया माझा
तेच टाळती अता मला जे बोल मधाचे बोलत होते

 

त्या बेटाची ओढ लागली ज्या बेटावर कुणीच नाही
खरेच कोणी बेटावर त्या एकेकाळी राहत होते ?

 

श्री. अविनाश सांगोळे

 

प्रतिक्रिया टाका