श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : – श्री.वा. न. सरदेसाई
श्रीरामरक्षा ‘अभंगात्मक भावानुवाद : -श्री.वा. न. सरदेसाई
पापविनाशिनी इच्छाफलदायी
सुज्ञाने वाचावी . . रामरक्षा ।।
करो तो राघव
रक्षण शिराचे
माझिया भाळाचे
दाशरथी ll १ ll
सुत कौसल्येचा
जपो नेत्रद्वय
विश्वामित्रप्रिय
कर्णयुग्म ll २ ll
केले असे ज्याने
यज्ञांचे रक्षण
करावे पालन
नासिकेचे ll ३ ll
सुमित्रेचा पुत्र
ज्यासी आवडता
तोचि होय त्राता
वदनाचा ll ४ ll
सकळ विद्यांची
जणू होय खाण
जिभेची राखण
करो माझ्या ll ५ ll
भावे वंदियले
ज्यासी भरताने
त्याने हा तारणे
कंठ माझा ll ६ ll
करी जो धारण
स्वर्गीय आयुधे
ठेवी माझे खांदे
सुरक्षित ll ७ ll
शिवधनू ज्याने
केलेसे खंडित
भुजा संरक्षित
ठेवो तोचि ll ८ ll
ज्यासी स्वयंवरी
जनकदुहिता
करांची दक्षता
त्याने घ्यावी ll ९ ll
जमदग्निपुत्रा
दावी पराजय
तो माझे हृदय
रक्षिता हो ll १० ll
निर्दाळिला ज्याने
खर निशाचर
तो माझे उदर
प्रतिपाळो ll ११ ll
दिला जांबुवंता
आपुला आश्रय
नाभीला अभय
त्याने द्यावे ll १२ ll
सुग्रीवाचा स्वामी
अशी ज्याची ख्याती
त्याने माझी कटी
सांभाळावी ll १३ ll
असे ज्या प्रभूचा
दास हनुमान
जांघांचे जतन
तोचि करो ll १४ ll
रघुवर होवो
मांड्ञांचा रक्षक
कुळ – संहारक
राक्षसांचा ll १५ ll
गुढग्यांची रक्षा
करो चिंतामणी
सेतूची बांधणी
ज्याने केली ll १६ ll
दशमुख ऐसा
वधिला रावण
द्यावे संरक्ष्ण
पोटर्ञांसी ll १७ ll
वैभव अर्पण
केले बिभीषणा
माझिया चरणा
राखो तोचि ll १८ ll
असा माझा राम ,
घेणारा काळजी
सर्व काया माझी
सांभाळो तो ll १९ ll
पूर्वप्रसिद्धी : ‘ ज्ञानदूत ‘वार्षिक आणि ‘ भालचंद्र ‘ दीपावली अंक १९९६ .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा