श्रावणाची जादू
चल , श्रावणाची जादू
खुल्या निसर्गात बघू
तिथे म्हणे, जोडीदार
होती मैना आणि राघू !
जसे झाकाया असते
जादुगाराचे फडके
तसे जांभळ्या दरीत
गूढ पांढुरके धुके !
लता-वेलींचा मेळावा
गवताच्या पायघड्या
सुरू फुलपाखरांच्या
फुलांभोवती फुगड्या !
शेत शेत होते पाटी
राबताना बैलजोडी
रोपे भाताची काढती
वर हिर्वी बाराखडी !
कसा दिसे धबधबा
कोसळता कपारीत
जणू उभ्यानं धावते
नदी सोडूनिया रीत !
कुठे ओळीत पाखरे
देती सरीला सलामी
दाट झाडीत झडती
रानगीतांच्या तालमी !
सोन्याचांदीचा चालतो
ऊन-पावसाचा खेळ
सात रंगांचा क्षितिजी
झुले अधांतरी पूल !
तिथे बांधावे लागते
घट्ट मिठीत घरटे
रहायचे कसे . . सांगू
दोन असून एकटे !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा