वेडी . .
मनाच्या पायथ्याशी
वसे ती आजही वाडी
— तिथे जाऊन मी येते
— जशी आले क्षणाआधी . .
गुलाली मख्मली वाटा
उडाले दावुनी पक्षी
कडेला रानदुर्वांची
गडद हिरवी-निळी नक्षी
–रूतावा रेशमी काटा
— अशीही वाट एखादी . .
जुन्या त्या ओळखींनाही
कसा ताजेपणा अ़जुनी
मला पाहून शेतांनी
हळू रुंदावली जिवणी
–नदीने वाहिली हसरी
–तिच्या ओठांतली चांदी ..
उन्हाला पंख फुटलेले
तशी ती सावली होती
तिथे त्या आमराईशी
फुले दोघांतली प्रीती
–म्हणाले त्यास मी वेडा
–म्हणाला तो मला वेडी . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा