विसरा आता आठवणींनो खास निमंत्रण . .
सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : कल्याण
गण : गागागागा गागागागा गागागागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १५८
विसरा आता आठवणींनो , खास निमंत्रण . .
माझ्या दारवर केव्हाचे सुकले तोरण !
लालचुटुक हे ओठ जरी धरतात अबोला ,
पोपटपंची छानच करते हिरवे काकण !
चित्रामधला श्रावणही असताना ओला ,
माझ्या दारी का पारोसा येतो श्रावण ?
तुमच्या बागा फुलती . . त्याही आडोशाला !
माझ्या बागेला गंधांचे असते कुंपण !
घरभेद्यांनो , मी हरलो घरचीच लढाई . .
युद्धासाठी आहे अजुनी मुक्त रणांगण !
मरण्याची ती वेळ किती सोयीची होती . .
जगण्याच्या नादातच हुकले सोनेरी क्षण !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा