वा न सरदेसाई : हायकू
कवी वा न सरदेसाई : हायकू
निळे जांभळे दूरचे डोंगर
दिसतात अगदी
छापल्यासारखे सुंदर .
खंड्याचा उभा पाण्यात सूर
चोचभर मासा
आभाळभुर्रर्र .
दुपारचं उन्ह
ह्या दारानं आलं
त्या दारानं गेलं .
चालताना ठेच लागली
मख्ख दगडाकडे पाहिलं
त्याची कीव आली .
दूर पडलेली लख्ख नदी
मला वाटते चट्दिशी
इथूनच उचलावीशी.
पुष्कळ चमकतायत तारे
पण , त्यांतील एकच म्हणतोय् मला
‘ अरे – कारे ‘ !
कुणाशी बोलू नये
असं वाटलं
काहीतरी लिहावंसं वाटलं .
इथून साप सळसळत गेलाय्
म्हणून हिरवळ इथली
अंग चोरून बसलेली .
मी फूल खुडलं
त्याआधी त्याला
डोळे भरून पाहिलं .
हिरव्या रंगावर लालशेंदरी ठिपके
झाडीमधून डोकावणारे
कौलारू घरांचे झुबके .
आकाशावर कविता रेखाटणार होतो
पण , चांदण्या
जागा अडवून बसल्यात ना !
कुंपणावर सांदीकोपर्यात
एका सापाची
चमकतेय कात .
पानांनी हलू नये
पानांवरच्या दवांनी
जरासुद्ध ढळू नये .
हिरवळीवर फुलं डोलतायत
वाटेवरच्याला
हसून ओवाळतायत .
मला माझ्या नवीन घरी
आनंद गावणार आहे
मी गुलमोहोर लावणार आहे .
घाई करतायत
फुलं प्राजक्ताची
अंगणात सडा टाकण्याची .
फुलपाखराला फुलं दिसतात
मी का दिसत नाही ?
माझ्या अंगावर ते बसत नाही .
टक लावून खिडकीबाहेर
बघत होतो कुठेतरी
काही दिसत नव्हतं तरी .
ती डहाळी छान
की , तो पक्षी सुंदर ?
आपपल्या जागी दोन्ही मनोहर .
हे कुंपण वाटतंय कुठे ?
हा पानाफुलांचा आडोसा
ह्याला आहेत कुठे काटे ?
बाहेर पाऊस थांबला आहे
मी घरात असून
ओला आहे .
दगडाचा हाही नेम
नाही लागला
कैरी अजून शेंड्याला .
झुळुकेचा पत्ता नाही
पानसुद्धा हलत नाय्ये
श्वासापुरती हवा आहे .
दोन मुंग्या जोडीने
जातात तरी कुठे
एकमेकींच्या ओढीने ?
काव काव ओरडून
मित्रांना बोलावतोय कावळा
शिळे तुकडे टाकल्यापासून .
संथ नदीच्या तव्यावर
एका दगडाने टाकल्या
सलग चार भाकर्या .
सूर्यकिरणांचे कोवळे भाले
बागेतल्या फुलांनी
हसत झेलले .
——————————————————————
कवी वा न सरदेसाई
लेखनकाळ : ४ मे १९९५ ते ५ मे १९९५
——————————————————-
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा