वा.न. सरदेसाईंच्या रुबाया – लेखक – डॉ.श्री. राम पंडित

वा.न. सरदेसाईंच्या  रुबाया – लेखक  – डॉ.श्री. राम पंडित

उस्ताद रुदकीने तयर केलेली चोवीस रुबाई वृत्ते , हजरत इल्लाम इश्क आबादीप्रणीत बारा रुबाई वृत्ते आणि डॉ. जार

इल्लामची अठरा वृती मी ” आकंठ ” च्या २००२  सालच्या गझल विशेषांकात विस्ताराने दिली होती.
या सर्व वृत्तांपैकी अठरा मफऊल ( गागाल : म्हणजे ” त ” गणाने ) सुरू होतात. अठरा मफऊलुन

( गागागा : म्हणजे ” म ” गणाने ) सुरू होतात व अठरा फाइलुन ( गालगा : म्हणजे ” र ” गणाने ) गणाने सुरू होतात. शेवटची जार इल्लाम यांची अठरा रूबाईवृत्ते अद्याप सर्वच  छंदवेत्त्यांनी स्वीकारलेली नाहीत. परंतु रूबाईचे मूळ वजन आहे ते आहे – ” ला हवल वला कुव्वत इल्ला  बिल्लाह ” त्यानुसार या वीस / एकवीस मात्रांच्या आधारेच त्यांनी ही वृत्ते बांधली आहेत . तसेच , फाइलुन

हा गण रुदकीने आपल्या रूबाईवृत्तांत चार जागी वापरलेला आहेच .

वा.न.सरदेसाई यांनी या वृत्तांचा सखोल अभ्यास करून सर्वच मान्यताप्राप्त वृत्तांत शिवाय, काही

अद्यापी अस्वीकृत असलेल्या  वृत्तांतही एकूण एकशे सव्वीस रूबाया रचल्या आहेत. एवढेच नव्हे , तर त्या सर्व उत्तम दर्जाच्या रचल्या हे विशेष होय.

खरे पाहिले तर, उपरोल्लेखित वृत्तांपैकी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस तरी रूबाईवृत्ते थोडी कठीण आहेत .

म्हणजे मराठी रचनेसाठी हवी असलेली गेयता , लय त्यात फारशी नाहीच , असे म्हणण्यास वाव आहे. पण सरदेसाईंची शब्दांवर असमान्य हुकुमत आहे. छंद कितीही अवघड असो, तो त्यांना सहजपणे वश होतो

असा माझा अनुभव आहे. मनाचे समाधान होईस्तोवर सरदेसाई आपल्या रचनेचे स्वत:च कठोर

समीक्षक बनून परिवर्तन करीत असतात . मग हे परिवर्तन शब्दांचे असते , विषयांचे असते ,

कल्पनेचेही असते . याच हातोटीमुळे सरदेसाईंनी अल्पावधीत समग्र रूबाईवृत्तांत ओघवत्या भाषाशैलीतल्या टवटवीत अशा रूबाया रचल्या आहेत.

उर्दूत जरी गुरुवर्णाऐवजी दोन लघू वर्ण योजण्याची सूट असली तरी बहुतांश ठिकाणी त्यांनी

ती सूटदेखील न घेता छंदांचा वापर केला आहे. रुदकी किंवा हजरत इल्लाम इश्क आबादी

यांची जवळपास सगळीच वृत्ते हिंदी-मराठीतच नव्हे तर उर्दूतदेखील क्लिष्ट वाटावी अशीच आहेत. उर्दूतील शंभर

शायरांपैकी फक्त दोन शायर रुबाया रचतात असं म्हटलं जातं . त्यादेखील संख्येच्या  दृष्टीने तुरळकच असतात . अमजद हैदराबदी , आतिश , यास गयाना चंगेजी ,फिराक , जोश ,

जॉनिसार अख्तर ही यांतली महत्वपूर्ण नावे .पणे गेल्या  दोन दशकांत तरी माझ्या वाचनात उर्दू शायरांचा नवा रुबाईसंग्रह आला नाही . या पार्श्वभूमीवर मराठीत वा.नं चे विपुल प्रमाणात विशुद्ध रुबाईसृजन अत्यंत लक्षणीय मला निश्चित वाटते.

रुबाईत पहिल्या ओळीत एक वक्तव्य / विधान , नंतरच्या दोन ओळींत त्यांच्या समर्थनार्थ

 तर्कनिष्ठ वा मनोज्ञ विवरण ( विस्तार ) आणि चवथ्या चरणात मंत्रमुग्ध करणारा

 आकर्षक समारोप असतो. सर्वसाधारण याच निकषावर रुबाई तपासली जाते.

मुस्तजाद गजलप्रमाणे मुस्तजाद रुबाईदेखील असते . ज्या रूबाईचे चारही चरण रदीफकाफियायुक्त असतात तिला शुद्ध रुबाई म्हणतात . ज्या रूबाईत तिसर्या चरणात 

रदीफकाफिया नसतो ती खस्सी रुबाई संबोधली जाते. हीच रुबाई  सर्वाधिक प्रचलनात आहे.

“उत्तररात्र ” या रॉय किणीकरांच्या संग्रहातील रचना “रुबाया” म्हटल्या जात असल्या

तरी त्या छंददृष्ट्या रुबाया नाहीत तर “कताअत ” आहेत. वा.न.सरदेसाईंनी तिन्ही

प्रकाराच्या रुबाया लिहिल्या आहेत . सरदेसाईंच्या रुबाईचे स्वरूप अस्सल मराठीच आहे .

त्यात उर्दूचे अनुकरण कुठेच आढळत  नाही .

सरदेसाईंनी लिहिलेल्या रुबायांचे काही रंग बघा – –

रस्त्यात कसा अडमडला दगड मधेच ?
लगून कशी मज गेली अवचित ठेच ?
तंद्रीतच वाटे , चुकले पाउलवाट . .
इतक्यात , तुझे घर आले हसत पुढेच !

हे रुबाईवृत्त ” अखरब मकफूफ मकफूफ मुखन्नक अहतम ” ह्या नावाने ओळखले जाते. सरदेसाईंनी रदीफ घेतला नाही तरीही यात एक प्रकारची प्रवाहमयता आहे .

कोठे उरली आता शांतता जगात ?
युद्धेच हवीशी आम्हांस वाटतात.
कुंड्यांमधल्या रोपांना अलीकडील ,
काटेच फुलांपेक्षा जास्त लागतात !

सामाजिक बदलातून जाणवलेली तीव्र सल या रुबाईत प्रभावीपणे प्रतिबिंबित झालेली दिसते.

जार इल्लामीच्या एका रुबाईवृतात सुरेख गेयता आहे.

या वृतास ” अजतर मकबूज मकबूज मजबूज ” असे नाव असून हे आपल्या

छंदशास्त्रातले ” कलापति ” वृत्त आहे.

या सुरेख वृत्तात सरदेसाईंची एक रुबाई पहा – –

आजचे मला असे नवीन चांदणे . .
पाहेले असे दुधी कधी न  चांदणे
चांदण्यास लाजरा सुगंध ये नवा . .
जाहले गडे, तुझ्या अधीन चांदणे !

एकाच वेळी विविध रुबाईवृत्तांत वेगवेगळ्या एकशे-सव्वीस रुबाया रचलेल्या उर्दूतील काव्यसंग्रहातदेखील आढळत नाहीत.  उर्दूत बर्याचशा

रुबाया रुदकीच्या चोवीस वृत्तांतच दिसून येतात . म्हणून सरदेसाईंच्या

या रुबायांचे महत्त्व मराठी शायरीत उल्लेखनीय ठरेल.

उर्दूतील प्रख्यात शायर व छंदज्ञाता कमाल अहमद सिद्दीकी

यांनी ” आहंग ओर उरूज ” या ग्रंथात रुदकीच्या चोवीस अवजानांमध्ये सहा रुबाया

लिहिल्या आहेत . म्हणजे सहा रुबायांतील एकेक असे चोवीस चरण या चोवीस

वृत्तांत रचले आहेत. उर्दूत रुबाईच्या संदर्भात ही सूट आहे. याच धर्तीवर वा.न.सरदेसाई

ह्यांनी रुदकीच्या चोवीस अवजानांमध्ये दोन वेळा अशा एकूण बारा रुबाया

(एकदा सहा आनि दुसर्यांदा सहा ) रचल्या असून प्रत्येक चरणासाठी त्यांनी  स्वतंत्र रुबाई अवजान (वृत्त ) निवडून त्याचे क्रमांकही दिले आहेत . वा.न. सरदेसाईंच्या

रुबायांचे हेही एक वैशिष्ट्यच म्हणावे  लागेल.

 (  ” अंगाई ते गझल – रुबाई  –  समग्र वा.न.सरदेसाई  ” ,  ह्या पुस्तकाच्या  डॉ.श्री. राम पंडित ह्यांच्या प्रस्तावनेतून )

प्रतिक्रिया टाका