वाहवा ! दुनियाच सारी . .

मात्रावृत्त : कालगंगा
लक्षणे : ( गालगागा गालगागा गालगागा गाल+ ) २६ मात्रा
( + म्हणजे निच्छित गुरू )
छंदोरचना पृष्ठ क्र. ४०३

 

वाहवा ! दुनियाच सारी जाहली निर्दय अता !
रोज अमक्याचेच मजला राहिले ना भय अता !

 

जे खरे ते ह्या फुलांना सांगुनी पटते कुठे ?
मी दिसे ताजा तरीही खूप झाले वय अता . .

 

साहवेना हार म्हणुनी काल ते लढले पुन्हा
अन् अपेक्षेहून मोठा पेलवेना जय अता !

 

सहज खोटे बोलणेही एवढे सोपे नसे . .
चेहर्‍यावर हा कशाला मागुनी अभिनय अता !

 

फुकट त्यांना माल कच्चा गावला खाणीमधे
कंपनी त्यांची हवेचा करितसे विक्रय अता !

 

हे मला उचकीतुनी मी संपताना समजले ..
एकदा आली तुलाही विसरल्याची सय अता !

 

काव्य – लेखन दिनांक २५.०९.१९९९

प्रतिक्रिया टाका