वासंतिक देहावर तुझिया

वृत्त : लवंगलता

 

वासंतिक देहावर तुझिया, मोहर फुलाफुलांचा

दॄष्ट न लागो , आधीच पदर सावर फुलाफुलांचा !

 

आठवणी करतात तुझ्या मग, माझ्याशी गुजगोष्टी
फुलदाणीतुन ऐकू येतो सुस्वर फुलाफुलांचा !

 

जिकडेतिकडे फुलझाडांनी कशा बहरल्या बागा !
जमिनिला का फुटला आहे पाझर फुलाफुलांचा ?

 

आटप लवकर फुलराणीचे लग्न उरकुनी येऊ . .
अंगावर हा झगा असू दे , तोवर फुलाफुलांचा

 

ही जी दिसते उभ्या शिवारी . . आहे चांदणमाती . .
मी बाळगतो शेतीसाठी नांगर फुलाफुलांचा !

 

.

प्रतिक्रिया टाका