वारसा . .

कोकणच्या पाळण्यात
माझे बाळपण गेले
झुल्यावर टांगलेले
रनकुसुमांचे झेले . .

 

लाल चौथर्‍याची चड्डी
शर्ट पांढरा अंगात
शाळा माझी वाट बघे
फळा घेऊन हातात . .

 

शाळेतल्या गोंगाटात
एक लय असायची
पाढयांच्याही फटाक्यांत
वाजे लड कवित्तेची . .

 

शाळा सुटल्यावर मी
घरी पळत जायचा
मग गोबर्‍या गालाचा
मुका आईने घ्यायचा . .

 

विटिदांडूच्या खेळात
होई निसर्ग जिवंत
पंख विटिला फुटत
कडेकपारीला हात . .

 

डोंगरात फिरताना
अशी काही मजा वाटे
करवंदीच्या जाळीला
गोड मखमली काटे . .

 

रानसाली फळे पाने
ह्यांचा साधासुधा चीक
पण, बजावीत असे
लोक जोडायला शीक  ! . .

 

आमराईत हिंडण
दीस बुडाल्यावरही
परतीच्या वाटेवर
होत सोनियाच्या गाई . .

 

माडापोफळींनी मला
रेखा चित्रांसाठी दिली
डोलणार्‍या माणग्यात
माझी बासरी वाजली . .

 

आंब्याफणसांनी मला
केले जन्माचा रसिक
देवळाच्या पायरीला
हात शिवले भाविक . .

 

बागडता नि डुंबता
जरी पडलो झडलो
शहरात आलो तेव्हा
पाच फुटांनी वाढलो . .

 

– मला माझ्या कोकणचा
नाही उगा अभिमान
माझ्याकडे वारशानं
आलं सागराचं मन !

 

 

प्रतिक्रिया टाका