वाटेत ना एकही झाड अद्याप . .

अक्षरगणवृत्त : सारंग
गण : गागाल गागाल गागाल गागाल ( यती पादांती )
छंदोरचना पृष्ठ क्र. १९०

 

वाटेत ना एकही झाड अद्याप . .
मध्यान्ह घेऊन चालायचा शाप !

 

 

आहे कुठे ह्या धरेलाच माहीत ?
सोसायचा माणसांचा किती व्याप .

 

 

हे केवढे चेहरेही सराईत !
सारे दिसाया गुन्हेगार अश्राप .

 

 

ठेऊ कुणाच्यावरी ठाम विश्वास ?
ह्यांची अशी थाप . . त्यांची तशी थाप !

 

 

का जंगली मानता रानवार्‍यास ?
वेणूतुनी घे किती गोड आलाप !

 

—-

प्रतिक्रिया टाका