वाटले इकडे . . तरी ते एरव्ही तिकडेच होते . . ( हजल )

मात्रावृत्त : मध्यरजनी

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा+   .

( + म्हणजे हमखास गुरू )

 

वाटले इकडे . . तरी ते एरव्ही तिकडेच होते . .

ऐनवेळी , ते तिथेही अन् इथे . . उघडेच होते !

 

विश्वशांतीचे अताशा दूत ते झाले ;

तरीही जन्मल्यापासून त्यांचे लाघवी झगडेच होते !

 

जिंकलो असलो , तरी मी त्यांपुढे किरकोळ होतो

ते असे हरले कसे , जे मूळचे तगडेच होते ?

 

केवढ्या झोकात त्यांनी टाकली झोळीत दाने !

चार दिवसांचे खरे तर , ते शिळे तुकडेच होते.

 

शब्द त्यांनी फिरविला अन् त्या क्षणी लक्षात आले . .

की , अरेच्या ! रंगबदलू लोक ते सरडेच होते !

 

त्या सुखाला घालण्याला एकही सदरा नसावा ;

आणि दु;खाला पहा ना , भरजरी कपडेच होते !

 

.

प्रतिक्रिया टाका