वाजली त्यांचीच तोंडे . .
अक्षरगणवृत्त : देवप्रिया
गण : ( गालगागा x ३ ) + गालगा
वाजली त्यांचीच तोंडे , फक्त मी होतो मुका . .
शांत माझ्या राहण्याने गाजल्या माझ्या चुका !
तू नको ह्यांना विचारू प्रश्न वेड्यासारखे . .
कोठला रे , ह्या फुलांचा गाव . . भाषा . . तालुका ?
स्वागतम् ! माझ्या घराचे दार आहे ठेंगणे . .
आत येताना नभांनो , थोडके खाली झुका !
आसवे माझी पुसाया तू अता येऊ नको . .
शेवटी हा एक अश्रू राहिला . . तोही सुका .
थोर निष्ठावंत वैरी पाहिले प्रत्यक्ष मी ,
माझिया प्रेतावरीही रोखताना बंदुका !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा