वाकण्यापेक्षा मला. .

व्रुत्त :मध्यरजनी
लगावली  : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ . ( + म्हणजे हमखास गुरू )

 

वाकण्यापेक्षा मला , मी मोडणे मंजुर आहे !
ढाल तुटता , वार हाती झेलणे मंजुर आहे !

 

 
दूर होताना गळा का आपुला  दाटून येतो ?
की , मुक्याने आसवांना बोलणे मंजुर आहे ?

 

ह्यांतले सारेच कुठले सांध्यण्याच्या लाय़कीचे ?
जुळवुनी घेईल  त्याला  जोडणे मंजूर आहे !

 

सहज ते चुकतात , तेव्हा मी जरा मुद्दाम चुकतो . .
एरव्ही , माझे  कुणाला वागणे मंजूर आहे !

 

मी तुझ्या आधीन झालो  . .  दे सजा तू कोणतीही
उन्हही मंजूर आहे  . .  चांदणे मंजूर आहे  !

प्रतिक्रिया टाका