लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही
मात्रावृत्त : रसना
लक्षणे :गा गालगाल गा+ , गा गालगाल गा+ ( + =निश्चित गुरू )
लपवून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही
उघडून दावण्याचा ‘ हा ‘ मात्र घाव नाही
स्तुतीपाठकांत मजला कोठेच वाव नाही
पढवून बोलण्याचा माझा स्वभाव नाही !
मोहांस खास असते त्यांच्या सदैव तेजी
माझा सुवर्णचाफा , त्याला उठाव नाही !
ह्या पालखांस खांदे आहेत नास्तिकांचे
आतील देवतांचा आता निभाव नाही !
परक्यांस धार्जिणा का हा आज गाव माझा ?
माझे कुण्या घराला ठाऊक नाव नाही !
श्रीमंत माणसांच्या श्रीमंत यातनाही . .
ज्यांची गरीब दु:खे , त्यांना दुखाव नाही !
कोर्या वसाहतींनी अपुल्या स्मृतीच पुसल्या
येथे न नीलकमळे . . अन् तो तलाव नाही !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा