रुजू जरी दिलेस तू . . .

वृत्त   : कलिंदनंदिनी 

गण :  लगालगा लगालगा लगालगा लगालगा

 

रुजू जरी दिलेस तू . . . फुलायचेच राहिले
उन्हास श्रावणातल्या भिजायचेच राहिले !

 

मला कुठे पसंत हा , असा उदास चेहरा ?
मनात लाख आणले .  . हसायचेच राहिले !

 

फुले बरीच ओवली , तरी न हार साधला
तळाकडे सुतास गाठ द्यायचेच राहिले .

 

नव्या घरात येउनी कितीक काळ लोटला . . .
जुन्या घरील नाव ते , पुसायचेच राहिले !

 

पुन्हा मला अशी कशी तिथेच ठेच लागली ?
कळूनही कधीकधी वळायचेच राहिले !

 

तुला नको असून मी , उगा कशास तेवलो ?
क्षणात फुंकरीत त्या , विझायचेच राहिले !

 

युगेयुगे जरी इथे सबंध रात्र जागलो ,
उजाडते तरी कसे , बघायचेच राहिले !

 

प्रतिक्रिया टाका