रान फुलांनी उजळू लागले . .

अक्षरगणवृत्त : स्नेहलता
गण : गाललगा गाललगा गा s लगा
छंदोरचना पृष्ठ क्र.३०४

रान फुलांनी उजळू लागले . .
भूवर तारे उगवू लागले !

गाव तुझे स्पष्ट दिसू लागता ,
पाय भुईला विसरू लागले !

रोज नवे स्वप्न मला भेटते . .
रोजच आयुष्य सरू लागले !

तू दिसता कंटक गेले कुठे ?
त्यांस अता फूल धरू लागले .

सज्ज जसा मी लढण्या जाहलो ,
युद्धच साक्षात हरू लागले !

.

प्रतिक्रिया टाका