रानोमाळी शिंपित अमृत आला श्रावण . .
मात्रावृत्त : अनलज्वाला
लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प l प l प ) .
प म्हणजे ८ मात्रा.
छंदोरचना पृष्ठ क्र. ३६३
रानोमाळी शिंपित अमृत आला श्रावण . .
दानाचे आश्वासन पाळत आला श्रावण !
चांदीच्या थेंबांचे पैंजण बांधुनि पायी ,
पानोपानी छमछम नाचत आला श्रावण !
कशी अचानक कडेकपारी फुले उमलली ?
मऊ हिरवळीवरून हासत आला श्रावण !
बाळउन्हांशी अंगणबांधी नदीकिनारी . .
लपंडाव ओलेता खेळत आला श्रावण .
नभी पर्यांच्या वाटेवर हा उत्सव कसला ?
सडा सात रंगांचा टाकत आला श्रावण !
‘ सोडा घरटी . . हवेत थोडे डुंबू सगळे . . ‘
चिंब पाखरू सुटले सांगत – ‘ आला श्रावण ! ‘
सुवासिनींच्या मुग्ध लाजर्या गाली ओठी . .
शृंगाराचे तुषार गोंदत आला श्रावण !
.
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा