रानभेट . .

रानापासून
मी खूप काही घेतलंय् . .
— रानासारखं मोठं मन नसतं
घराचंही !

 

जसं पेरावं तसं उगवतं रानात .

 

. . मनाचा खण उघडावा
की , कणाचा मण
पदरात घालतं रान !

 

. . माझी कविता
तिथेच मला येऊन भेटते . .
हिरवळीवर . . झर्‍याकाठी . .
वार्‍याच्या वाटेवर —
वेडे होऊन बोलत बसतो आम्ही
कितीतरी वेळ . . .
सांजावलं की , गुंतलेली रानभेट
जडपावली नजरेआड होते . .
मग ,
मागं रेंगाळणारं मन
कवितेला
एक अधीर प्राणहाक हालतं

 

नि ,
कडेकपारीच्या ओंजळीत
तिचा शब्द
माझ्यासाठी सारं रान वेचून ठेवतं !

 

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका