रानपण . .

मळलेल्या पाऊलवाटांचे
हे स्वार्थी नजराणे !
सार्वभौम सम्राटानं
नाइलाजानं स्वीकारलेलं मांडलिकत्व !

. . एक लयास गेलेलं रानपण .

 

– इथे आता
माणसाची वहिवाट आहे . . .
माणसाच्या पायाची दूषित धूळ
इथल्या कणांत मिसळलीय् . .

 

माणसाच्या श्वासांतले क्षुद्र विचार
इथल्या वार्‍यावर तरंगतायत्
आभाळाचं निळेपण रुसलंय्
मातीचं हिरवेपण नासलंय् . .

 

. . इथे वृक्ष आहेत . छाटलेली .
वेली आहेत . तुडवलेल्या
पानं – फुलं ओरबडलेली , , कुस्करलेली !
इथे नदी आहे पण नागडी – उघडी . . .

 

इथे पक्षी आहेत – पाखरं आहेत . ,
पण ,
बावरलेली . . बिथरलेली !
झाडांवर घरटी आहेत कुठेकुठे टांगलेली
पण , कारागिरांनी अर्धवट विणून
त्यांच्याकडे पाठ फिरविल्यासारखी !

 

इथे सारं काही आहे . .
पण रान नाहिये . . रान नाहिये ! !

 

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका