रस्त्यास बेत माझा जेव्हा कळून गेला
मात्रावृत्त : रसना
लक्षणे : गा गालगाल गा+ गा गालगाल गा+
+ म्हणजे निच्छित गुरू
छंदोरचना पृष्ठ क्र. ४०९
रस्त्यास बेत माझा जेव्हा कळून गेला ,
थांबून तोच माझ्या पाया पडून गेला !
वचने दिलीस तेव्हा . . खोटे कशास सांगू ?
नजरेपुढून माझ्या तारा तुटून गेला !
गर्दी जरी कितीही मी टाळली तरीही . .
तो एकटेपणाही मजला छळून गेला .
एकाक्षणात वस्ती का बिचिराख झाली ?
तोंडून शब्द ह्यांच्या जळता निघून गेला !
निवली चिता तरीही धग जाणवे कशाने ?
तरणा कुणी निखारा अवचित विझून गेला !
त्या दीर्घ भाषणांचा सारांश सांगताना ,
माझाच शेर त्यांच्या ओठांवरून गेला !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा