रडत मी होतो जरी
वृत्त : मेनका
गण : गालगागा x २ + गालगा
रडत मी होतो जरी हसलो तरी
विझत मी गेलो जरी जळलो तरी !
ना कुणी वळला ऋतू माझ्याकडे
वाळवंटी एकटा फुललो तरी .
बिघडले तुमचे कुठे माझ्याविना ?
मजकडे पाहू नका दिसलो तरी !
लाव , मज प्याल्यातुनी ओठी तुझ्या
जाणवू दे , थेंब मी असलो तरी .
ह्या कुठे सरशीत आहे जीतही ?
शरण ते येतील मी हरलो तरी !
पालवे मीही कधी सोन्यातुनी
आपटा साधासुधा असलो तरी !
सादही घाला कधी दुरूनी मला . .
क्षितिज ओ देईल मी नसलो तरी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा