रंगवा मैफल तुम्ही . .
मात्रावृत्त : मध्यरजनी
लक्षणे: गालगागा गालगागा गालगागा गालगा+ .
+ म्हणजे निश्चित गुरू .
रंगवा मैफल तुम्ही . . मी तोवरी झिंगून येतो . .
रंजल्या वस्तीत माझे गीत मी गाऊन येतो !
त्या तुझ्या , मजला स्मृती ना विसरता आल्या कधीही . .
रोज मी वाळूत घरटे नवनवे बांधून येतो !
गाव हा माझा असा का राहिला मागासलेला ?
त्या पुढार्यांच्या घरांना दृष्ट मी लावून येतो .
जन्मल्यापासून ज्यांनी सूर्य आहे ऐकलेला ,
पापण्यांच्या आत त्यांच्या मी दिवा लावून येतो !
थांब पांथस्था , तुझे ना ह्यापुढे चुकणार रस्ते . .
त्या ध्रुवालाही दिशा मी एकदा दावून येतो !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा