मोकळ्या माझ्या घराला . .

वृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा

 

मोकळ्या माझ्या घराला दार नाही
कुंपणाला एक साधी तार नाही !

 

ये सखे , जोडू नवे नाते तृणाशी . .
फक्त हा माझा तुझा संसार नाही !

 

स्वच्छ कामे का मुहूर्तालाच होती ?
देवतांचा कोणताही वार नाही .

 

कोसळो आकाश . . आम्हां काय त्याचे ?
हा पिसापेक्षा निराळा भार नाही !

 

दोष माझा शोधती अद्याप सारे . .
धूरही नाही . . कुठे अंगार नाही !

 

ओळखीच्या शेकडो आहेत बर्च्या . .
हा जिव्हारी दूरच्याचा वार नाही !

प्रतिक्रिया टाका