मी न मायेने कधी कुरवाळले आयुष्य माझे . .
मात्रावृत्त : मध्यरजनी
लक्षणे :गालगागा गालगागा गालगागा गालगा+
( + म्हणजे निश्चित गुरू . )छंदोरचना पृष्ठ क्र. ४०४ .
मी न मायेने कधी कुरवाळले आयुष्य माझे . .
मुक्त हातांनी जगाला वाटले आयुष्य माझे !
प्रेम करण्याला जसा मी लागलो काट्यांवरीही ,
फूल होउनि दरवळाया लागले आयुष्य माझे !
मूळ सरितेचे . . ऋषीचे कूळही नाही विचारू . .
काय करता जाणुनी मग मागले आयुष्य माझे ?
वाढदिवसाला सुखाच्या ऐनवेळी येउनीही ,
संकटांनी केवढे शृंगारले आयुष्य माझे !
अशुभ स्वप्ने पडत होती काल रात्री . . अन् पहाटे . .
जाग आली . . पाहतो तो , वाढले आयुष्य माझे !
रोजचे येथील जगणे हीच माझी गझल आहे !
मैफलीतुन गा कधी तू . . एकले आयुष्य माझे .
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा