मी चित्रकार आगळा ..
चित्रकलेतुन करी साजरा रंगांचा सोहळा
मी चित्रकार आगळा ..
जमवियले मी मातीचे कण
उजेड वारा नभात हिंडुन
चिरंजीव रंगांसाठी मी
पाउसही वेचला . .
कोषांतच फुलपाखरे नवी
मिटलेली मी कळी रंगवी
बीजाचे अंतरंग झालो
चितारून मोकळा . .
मुक्त खेळतो रंगसप्तमी
रंग तरीही झाला न कमी
चराचरावर फिरतो माझा
अहोरात्र कुंचला . .
तरंगणारे . . उडते . . झुलते
रंग दिले मी कुणा बदलते
परि, न माणसाच्याच मनाचा
रंग साधला मला . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा