मी असा दिसलो . .
वृत्त : राधा
गण :गालगागा गालगागा गालगागा गा
मी असा दिसलो , तरी नाही तसा मी
फक्त झालो ह्या जगाचा आरसा मी !
ते जरी लपवीत असले अंतरीचे ,
ओळखूनी घेतल्या त्यांच्या नसा मी .
तू नको बदलू तुझ्या गल्लीतले घर . .
काय द्यावा पावलांचा भरवसा मी ?
बांधला गेलो खरा शब्दांत त्यांच्या . .
होउनी त्यांच्याच नावाचा ठसा मी !
‘ गप्प का देऊन संन्याशास फाशी ? ‘
एकट्याने कोरडा केला घसा मी .
चिंब बाहेरून मी भिजलो , तरीही
पेटलो आतून वेड्या पावसा मी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा