महाराष्ट्र

अम्हांस अमुच्या मातीची का ओळख आहे नवी ?
‘ महाराष्ट्र ‘ नावातच दडली देशाची थोरवी !

अभिमानाने पुढे काढुनी
पोलादी छाती
बुरुज गडांचे उभे राहिले
सह्याद्रीवरती
स्वराज्यातल्या चिर्‍यांस फुटली चैत्राची पालवी !

नद्यांत इथल्या रिते जाहले
मेघ अमृताचे
शेतमळ्यांतुन पीक भरजरी
वार्‍यावर नाचे
निढळाच्या घामाची वाहे थेंबांतुन जान्हवी !

घरांस इथल्या , शब्दसुरांचा
लळा लागलेला
मनामनांतुन भावभक्तिचा
मळा बहरलेला
रंगदेवता इथे रंगली माहेरी वैभवी !

विश्ववंद्य जाहले , मराठी –
भूमीतिल नेते
जगी चमकले चंद्र सूर्य जे
ते इथले होते
इथल्या मातीची पणतीही पृथ्वीला उजळवी !

————————————————————-

कवी वा न सरदेसाई
लेखनकाल : ०१ मे , १९९४

——————————————————————————————

प्रतिक्रिया टाका