मनापासून कोणाला इथे
वृत्त : वियतगंगा
गण लगागागा लगागागा लगागागा लगागागा
मनापासून कोणाला इथे माझा म्हणावे मी ?
कुणासाठी फुलावे मी . . कुणासाठी मिटावे मी ?
तिच्या राज्यात ह्या , माझी स्वत:ची कोठली जागा ?
मघाचे स्वप्न मेलेले , कुठे सांगा पुरावे मी ?
तुला मी उंबराचे फूल झालेले पहाताना,
रडू येऊन वाटावे , असेसुद्धा हसावे मी !
मिळेना न्याय सत्याला अशी न्यायालये जेथे,
तिथे माझ्या खर्यासाठी दिले खोटे पुरावे मी . .
उभा मी सूर्य आहे ठाम . . हा माझा गुन्हा झाला ?
फिरस्त्या ह्या ढगांमागे कशासाठी दडावे मी ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा