मनापासून कोणाला इथे माझा म्हणावे मी ?
अक्षरगणवृत्त : वियत् गंगा
गण लगागागा लगागागा लगागागा लगागागा
छंदो रचना पृष्ठ क्र. २८०
मनापासून कोणाला इथे माझा म्हणावे मी ?
कुणासाठी फुलावे मी . . कुणासाठी मिटावे मी ?
तिच्या राज्यात ह्या माझी स्वत:ची कोठली जागा ?
मघाचे स्वप्न मेलेले , कुठे सांगा पुरावे मी ?
सुखांनी माहिती नाही दिली केव्हाच दु:खांची
अतासे पाठ केले ह्या व्यथांचे बारकावे मी !
मिळेना न्याय सत्याला अशी न्यायालये जेथे,
तिथे माझ्या खर्यासाठी दिले खोटे पुरावे मी . .
उभा मी ठाम आकाशी . . गुन्हा हा सूर्य झाल्याचा ?
फिरस्त्या ह्या ढगांमागे कशासाठी दडावे मी ?
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा