‘ मग तुम्ही कवी कसचे ? ‘

मग तुम्ही कवी कसचे ?

. . . गुजराथेमध्ये मनाची कुचंबणा होत होती. वातावरण वेगळे नि मुख्य म्हणजे भाषेची पंचाईत. त्यात नवीन नोकरीचे दडपण .माझ्या तेधील गुजराथी शिक्षकमित्रांच्या संगतीने मी एफ वाय आर्टस ला बसलो . मराठी विषय घेतलेला . तिथल्या हायस्कूलच्या संस्कृतच्या शास्त्री सरांकडे आम्ही शिकवणी लावली होती. शास्त्रीसर विद्वान तर होतेच . शिवाय त्यांच्या चेहर्‍यावर विद्वत्तेचे एक तेज होते . ते शालीन होते . त्यांचे बोलणेही मृदू . घरचे वातावरण साधे पण शिस्तीचे !त्यांना हिंदी आणि संस्कृत ह्या भाषाच प्रामुख्याने अवगत होत्या . ते यू . पी. चे होते.

एके दिवशी ते मला म्हणाले , ‘ सरदेसाई , तुम्ही शीघ्रकवी आहात , असे मला कळले आहे . ‘

जवळचे हिंदीचे एक पुस्तक काढून त्यांनी पाने उअलटत एक पद्य मला दाखवीत म्हटले , ‘ हे पहा . . ही चार ओळींची कविता संस्कृत काव्यामधे इथे रचून दाखवा !
माझ्या पोटात धस्स झाले . म्हणालो , ‘ सर , मी काही तुम्ही समजता तसा शीघ्रकवी नाही . आणि ह्या हिंदी पद्याचा अनुवाद संस्कृतमध्ये आणि तोही काव्यात करणे म्हणजे . . आणि इथल्या इथे कसे शक्य आहे ?

मग तुम्ही कवी कसचे ? ‘ असे शास्त्रीसर म्हटल्यावर मी त्यांना काव्याचा अर्थ विचारला . तो त्यांनी सविस्तर शब्दशः सांगितला .

मला ते एक आव्हान वाटले .
म्हणालो , ‘ सर , उद्या ट्यूशनला येताना कविता करून आणतो . ‘

घरी गेलो . माझ्या आवडीचे खाद्य बर्‍याच दिवसांत मिळाल्याने मी खरे म्हणजे आतून खूष होतो .
समोर वही होती . त्या वहीवर शास्त्री सरांनी सांगितलेल्या व मी लिहून घेतलेल्या त्या ओळी होत्या . ..

हे जनि , हरि से हेत कर
कर हरिजन से हेत . .
मानमुलुख हरि देत है
हरिजन हरि ही देत

 

वरील हिंदी काव्य मुक्तक नसून तो चार ओळींत मांडलेला दोहा आहे.
अतिशय भावरम्य नि प्रासादिक चरणांचे ते मुक्तक पुन्हापुन्हा वाचले . त्यातील ‘ ह ‘ वर्णाचा नादमय प्रास मन प्रसन्न करीत असतानाच मी पेन सरसावले तेव्हा पहिली ओळ कागदावर उमटली ती ‘ भ ‘ वर्णाचा प्रास झंकारतच “ ताताजगागा गणि इंद्रवज्रा ” च्या तालावर !
‘ भो स्नेहभावेन विभुं भज त्वं ! ‘
आणि मग उस्फूर्तपणे बाकी तीन ओळी लिहिल्या गेल्या – काव्य साकार झाल . ‘ इंद्रवज्रा ‘ ह्या अक्षरगण-वृत्तातील ती रचना अशी होती –

 

भो स्नेहभावेन विभुं भज त्वं !
भक्तेषु स्नेहं कुरु ना तथैव
भाति प्रभो र्भूभगदानभुक्त :
यच्छन्ति भक्ता विभुमेव ते ना

 

दुसर्‍या दिवशी सर्व विध्यार्थ्यांसमक्ष शास्त्री सरांनी मला मारलेली घट्ट मिठी मी जन्मात विसरणार नाही. १९५७ ची ही गोष्ट .
पुढे वा. न. सरदेसाई लिहितात , ” मी त्यावेळी २० वर्षांचा होतो ” .
———————————————————————————
( ” अंगाई ते गझल – रुबाई – समग्र वा.न.सरदेसाई ” , ह्या पुस्तकाच्या श्री. वा. न. सरदेसाई ह्यांच्या मनोगतामधून )

प्रतिक्रिया टाका