भेट . .

जो जो आपल्या कामात
मनापासून गढला
हवेहवेसे वाटले
त्याचे दर्शन देवाला !

 

एका नटाला भेटला
देव प्रेक्षक होऊन
त्याने वाजविली टाळी
सोंग खरं समजून !

 

उभ्या पिकात हा देव
शेतकर्‍याला भेटला
पुसे , मोतियाचा दाणा
कणसात कसा आला !

 

देव कवीला भेटला
काव्यवाचनाच्या वेळी
गुणगुणत राहिला
त्याच्या कवितेच्या ओळी !

 

देव जेव्हा भेटीसाठी
गेला एका भक्ताकडे
त्याच्या मिठीत देवाला
स्वतःचीच भेट घडे . .

 

प्रतिक्रिया टाका