बोट लावून जो तो
बोट लावून जो तो मधाचे मला . .
थेंब पाजून गेला विषाचे मला !
बोलतो मीच जेव्हा मनाशी इथे ,
शब्द ऐकू न येती कुणाचे मला .
भेटता तू पडे छानसे चांदणे . .
स्वप्न का आज पडले उन्हाचे मला ?
मी जरी रोज वस्तीतला पाहुणा ,
दार उघडेच असते घराचे मला
मोजके मेघ . . तेही जिथे पांढरे . .
काय अप्रूप त्या श्रावणाचे मला ?
साप , मुंगुस मी पाहिले खेळता
घर जिथे लागले ‘ सज्जना ‘ चे मला
मी कसा काय हासायला लागलो ?
रंग लागून गेले फुलाचे मला !
रोजची जिंदगी गझल होती नवी . .
पुस्तकातून जग आज वाचे मला !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा