श्री. अप्पा ठाकुर

गझल  

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे

 

आयुष्याची सकाळ माझ्या खरेच संदर गेली
संधेची मज फिकीर नाही , दुपार बाकी आहे

 

आधाराने कसेबसे मज जगावयाचे नाही
जगण्यासाठी मनात उर्जा चिकार बाकी आहे

 

स्वार्थासाठी उगाच खोटा सालामे केला नाही
फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे

 

सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले
माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे

 

सरणावरती अता खरोखर निघेन आनंदाने
पण मॄत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे.

 

 

किती खरे अन् किती झूठ वावरतो आपण
बिनामुखवटे बहरूपयेही बनतो आपण

खरा चेहरा घेउन कोणी हिंडत नाही
स्वतः स्वतःचा बनुन तोतया फिरतो आपण

स्वप्नामागुन स्वप्ने तुटती समोर अपुल्या
तरी शेवटी स्वप्नांसाठी जगतो आपण

भावाभावामध्ये असते हाडवैरही
अन् रक्ताचे नाते असते म्हणतो आपण

जीवन म्हणजे नाते असते ह्या जन्माचे
अन् जन्माचे नाटक झाले म्हणतो आपण

सिद्ध कराया मीही आहे एक असामी
नकोनको ते उपद्व्यापही करतो आपण

प्रतिक्रिया टाका