फूल का त्यांना . .

अक्षरगणवृत्त : व्योमगंगा
गण : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

 

फूल का त्यांना मिळावे अन् मला काटा रुतावा ?
माणसांच्या सारखा हा काय झाडांचाच कावा ?

 

फक्त ‘ हो – ना ‘ बोलणे हा कोठला संवाद होता ?
अन् तुझ्या स्पर्शामधेही केवढा होता दुरावा !

 

चौकशीचे शब्द त्यांचे केवढे मिठ्ठास होते . .
मात्र , उच्चारांत होता एक छद्मी बारकावा .

 

लावुनी दारेबिरे , ही झोपली वस्ती कधीची
का न आता चांदण्याला हुंदकासुद्धा फुटावा ?

 

हे कसे आले अवेळी भैरवीचे सूर कानी ?
फुंक माझी . . आणि त्यांच्या राहिला हातांत पावा !

 

बांधला मी सूर्य डोई . . सावल्या माझ्या , वहाणा . .
मी निघालो वाळवंटी दूरच्या अज्ञात गावा !

 

प्रतिक्रिया टाका