प्रवास . .
असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू . .
सोबतीस हे श्वासांवरचे गाणारे पाखरू !
डोक्यावरती नभास पेलित
मी जाताना पुढे
धरतीच्या मायेने , माझ्या
बळ पायांना चढे
मुलासारखे छंदमोकळे चालावे तुरूतुरू !
कळ्याफुलांचे हसणे येते
माझ्या कानावरी
काटयाचे मी दु:ख झेलतो
तळपायाच्या उरी
डोळ्यांमधली ओली नाती लागतात पाझरू !
मनास देतो पानांतिल मी
खुडुनी हिरवेपण
बुडुन जातो कधी , जांभळ्या
गूढ डोंगरांतुन
कधी झर्यांचे बांधुन घेतो पायांना घुंगरू !
चंद्र बघे मी दिवसाकाठी
सूर्य रातचा दिसे
तिमिराच्या केसात खोवली
ही किरणांची पिसे
कणात होतो कधी लघू , मी गुरूहूनही गुरू !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा