पुशीत आसवे जशी . .

वृत्त : कलिंदनंदिनी
गण : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

 

पुशीत आसवे जशी हसायची खरी मजा
नसूनही जगात ह्या , असायची खरी मजा !

 

खुलून प्रेम आगळे करावया अधेमधे ,
तुझ्यावरी रुसूनही बसायची खरी मजा .

 

मला कशास आयती हवीत ही फळे , फुले ?
जमीन घाम गाळुनी , कसायची खरी मजा !

 

झकास पिंजर्‍यामधे उदास राहण्याहुनी ,
झुळूकवत् इथे – तिथे वसायची खरी मजा !

 

हजार दुष्मनांपुढे तुम्ही असाल मोजके . .
अशा लढ्यात कंबरा कसायची खरी मजा !

 

विषार होउनी कधी कुणास चावलो जरी
उतार व्हावया , पुन्हा डसायची खरी मजा !

प्रतिक्रिया टाका