पिसे . .
हवे मनी अदभूत पिसे
– – म्हणशील मग तू देव दिसे . .
असा एकदा बन बैरागी
माख उषेचा गुलाल अंगी
बघ , सोन्याच्या रथातले ते
– – बालरवीचे रूप कसे . .
चाल नदीच्या काठावरुनी
गुणगुण पक्षांसोबत गाणी
पडेल कानी जलदेवीचे
– – तरंगणारे गोड हसे . .
फळभाराने लवली राने
शेते कणसांच्या ओझ्याने
इवल्याशा मातीच्या पोटी
– – आकाशाचा गर्भ वसे . .
असुनि कुठे रे दिसती वारे
गंध दिसेना तरिही पसरे
जाणिवेतुनी देव पाहणे
– – सुख दुसरे ह्याहून नसे . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा