पापणी भिजू नये . .

अक्षरगणवृत्त : देवराज
गण : ( गालगाल ) ३ + गालगा

 

पापणी भिजू नये , असे रडून घेतले
आसवांमधून मी कधी हसून घेतले !

 

रंग पालटून फूल आज भेटताक्षणी ,
गंध मी उभ्याउभ्याच आठवून घेतले .

 

ना दिसे अजूनही नभात मेघ सावळा
मी कशास एवढ्यात नांगरून घेतले ?

 

माणसे नसून ही जनावरेच मानवी . .
पाहिले , इथे कुणी कसे विकून घेतले !

 

तारका अखेर मी अचूक मोजल्या कशा ?
बेरजेत काय मी मला धरून घेतले ?

 

दु:खही मला असे उगाच घाबरेल का ?
त्यास मीच एकदा किती छळून घेतले

 

प्रतिक्रिया टाका