निळी डोळ्यांची पालखी . .

लाजरीच्या पानातली
हिर्वी पदर – ओढणी
निळी डोळ्यांची पालखी
माझ्या सजणीला आणी . .

 

किलकिलते पडदे
तशा पापण्या मख्मली
येता वेशीशी पालखी
उरी वाजंत्री वाजली . .

 

मेणा थांबला अंगणी
खूर टेकिती नजरा
महिरपीशी गंधला
चंद्रफुलांचा गजरा . .

 

वेल वाकली झुकली
पाय उतरले भुई
जाई आकाश सांडून
दोन थेंब निळी घाई  . .

 

मुकेपणाला लागले
जड शव्दांचे डोहाळे
ठेच उंबर्‍यावरची
वेची आठवणफुले . . !

 

 

प्रतिक्रिया टाका