नवीन दोहे

पिकास पोषक होतसे , मेघाचे जलदान
तसे हिताचे लेकरा , मातेचे स्तनपान ! दि. ०३.०८.२०१७


झुळूक येता डोलते , आनंदाने फूल
काटा बसतो ढिम्मसा , जसे अडाणी मूल ! दि. ०४.०८.०१७


सुखदु:खाला फूल अन् काट्याचे उपमान . .
फूल अल्पजीवी परी , काटा आयुष्मान ! दि. ०९.०८.२०१७


भाव मनी असल्यावरी , पत्थरही भगवान . .
डबक्यामध्येही तुला , घडेल गंगास्नान! ! दि. १०.०८.२०१७


निंदा करणार्‍यासही बघा देउनी मान . .
स्तुती ऐकता सारखी , बंद करावे कान ! दि. .१०.०८.२०१७


हातीचे तुझिया तसे , छातीतही घड्याळ . .
एक कळीवर चालते , दुजे चालवी काळ ! दि. ११.०८.२०१७


स्वर डग्ग्याचा घोगरा . . तबला बोले गोड
मैफलीत पण गाजते त्यांची साथ विजोड ! दि. १३.०८.२०१७


तबला – डग्ग्याला मिळे मैफलीत बहुमान . .
दोघांना दो आसने , शेषाचिया समान ! दि. १५.०८.२०१७

तबला – डग्ग्याला बसे , दो हातांनी मार
मैफल गर्जे – ‘ क्या कहें . . आयी बडी बहार ! ‘ दि. १५.०८.२०१७
( मैफिल गर्जे – ‘ वाहवा ! आयी बडी बहार ! ‘ )

उदास का असशी जशी , बांधावरली धोंड . .
पहा , कसे शेतामधे फुले कपाशी – बोंड ! दि. १७.०८.२०१७


अशी प्रार्थनाही नको केल्याविण राहूस . .
” शेतात ‘ तुझ्या ‘ ही पडो , वेळेवर पाऊस ! ” दि. १७.०८.२०१७


मार अंकुशाचा शिरी , मग चाले गजराज
हातोडी बसता फुटे , तबल्याला आवाज ! दि. १८.०८.२०१७


थापांविण ना बोलवे , त्याचे नाव ‘ मृदंग ‘ . .
नामाविण ना राहवे , त्याने नाव ‘ अभंग ‘ ! दि. १३.०९.२०१७


माळी बघ बागेमधे . . कोळी भरदर्यात . .
साळी मागावर पहा , गढलेला कार्यात ! दि. १३.०९.२०१७


एका धातूचे जरी . . बघ , दैवाची चाल
झांज राहते मोकळी . . बंधनामधे टाळ ! दि. २५.०९.२०१७

प्रतिक्रिया टाका