धोरण्यांशी वागण्याची . .
मात्रावृत्त : मध्यरजनी
लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+
( + म्हणजे निश्चित गुरू )
धोरण्यांशी वागण्याची धोरणे आहेत माझी . .
ग्रीष्म येता विस्तवाची अंगणे आहेत माझी !
संशया रात्रीस जाग्या लागता डुलकी पहाटे
भेटण्यासाठी तुला ही जाग्रणे आहेत माझी
ह्या शहाण्यांना , शहाणे व्हावयाला सांगतो मी
हीच वेडा व्हायची का लक्षणे आहेत माझी ?
ह्या पसार्यातून साधे वाक्यही जुळता जुळेना . .
फाटक्यातुटक्या स्मृतींची कात्रणे आहेत माझी .
एवढ्या दु:खातही मी राहिलो हसरा कशाने ?
कल्पनेपेक्षा अकल्पित कारणे आहेत माझी !
साठवावेसे न जेव्हा राहिले डोळ्यांस काही ,
बंद कायम पापण्यांची झाकणे आहेत माझी !
दार माझ्या झोपडीचे वाजले नाही , तरीही
स्वागताला चांदण्याची तोरणे आहेत माझी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा